गुरुवार, 25 सितंबर 2014

आत्मबल का? कशासाठी?

इसे प्रकाशित किया Unknown ने तारीख और समय 3:05 am कोई टिप्पणी नही


आत्मबल - आंतरिक शक्ती

आज ह्याद्वारे ’आत्मबल-आंतरिक शक्ती’ हा ब्लॉग आपल्यासमोर प्रस्तुत होत आहे. ह्या ब्लॉगमध्ये ’आत्मबल’ हेच नाव असलेल्या एका उपक्रमाची माहिती व त्यासंबंधी ताज्या घडामोडी दिलेल्या असतील. हा उपक्रम डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशी (ह्यांच्या संपर्कात आलेल्या असंख्य स्त्रिया प्रेमाने त्यांना ’नंदाई’ हाक मारतात) ह्यांनी तयार केला असून ’श्री साई समर्थ विज्ञान प्रबोधिनी’ ह्या संस्थेच्या विद्यमाने त्या ह्याचे आयोजन करतात. २०१४ साली ’आत्मबल’ उपक्रमाने १४ वर्षे पूर्ण करून १५व्या वर्षात पदार्पण केले आहे.

’आत्मबल’ ह्या नावातच सर्व काही आहे.

’आत्मबल’ म्हणजे स्त्रियांमध्ये उपजतच असलेली आंतरिक शक्ती – अशी शक्ती जी प्रत्येक स्त्रीमध्ये असली, तरी प्रत्येक स्त्रीला त्याची जाणीव व्हावी लागते, अशी शक्ती जिच्याशी ओळख होण्याकरिता कधीकधी स्त्रीला प्रयास करावे लागतात, अशी शक्ती जी तिच्या आत खोल मनाच्या गाभ्यामध्ये दडून राहिलेली असते व हे प्रयास सुरू झाल्यानंतर हळूहळू तिच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग बनते व कालांतराने ती शक्ती तिचे व्यक्तिमत्त्वच बनते.

....कारण आत्मबलविकास हा कुठल्याही बाह्य उपायांपेक्षाही आतूनच होऊ शकतो, असा आमचा ठाम विश्वास आहे.

....आणि म्हणूनच हा ब्लॉग म्हणजे ’नंदाई’ने प्रत्येक स्त्रीकरिता पुढे केलेला प्रेमाचा व मैत्रीचा हात आहे.... त्या प्रत्येक स्त्रीला स्वत:ची ओळख पटावी ह्याकरिता चाललेले हे जे प्रयास आहेत, त्या प्रयासांच्या आनंदयात्रेत तिला सहभागी करून घेण्याकरिता घातलेली एक साद आहे. स्त्रीला तिच्यातील क्षमतांचा शोध लागला की तिच्यामध्ये जागृत झालेल्या आत्मविश्वासाने व उत्साहाने ती आयुष्याकडे बघायला लागते, मात्र आता आयुष्याकडे बघायची तिची दृष्टी बदललेली असते....त्यामुळे आता तिचे आयुष्यच बदलून जाते.

....कारण बदल हा आतूनच घडावा लागतो.

स्त्री, मग ती मुलगी, पत्नी वा आई अशा कुठल्याही भूमिकेत असो – ती कौटुंबिक धागे मजबूत करण्यामध्ये, मुलांची व्यक्तिमत्त्वे घडविण्यामध्ये म्हणजेच पर्यायाने सशक्त समाज घडविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र त्याकरिता मुळात तिला स्वत:मधील शक्तीची, सकारात्मकतेची आणि प्रेम देऊ व घेऊ शकण्याच्या ताकदीची जाणीव झाली पाहिजे.
....कारण तुमच्याकडे जे आहे, तेच तुम्ही देऊ शकता.

तर असा हा ’आत्मबल’ कोर्स आहे तरी काय?

हा सगळा विचार करूनच डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशी ह्यांनी अतिशय मेहनतीने हा कोर्स तयार केलेला आहे. दर आठवड्याला एक सत्र, असे ६ महिने हा कोर्स चालतो. एखाद्या विषयाला वाहिलेली छोटी नाटुकली, चर्चासत्रे, प्रोजेक्टस आणि प्रेझेंटेशन्स अशा गोष्टी ह्या कोर्सचा भाग असतात; ज्यांचा अभ्यास करता एकीकडे ह्या कोर्सच्या विद्यार्थिनींचा बाह्य जगाशी संपर्क साधला जातो, तर दुसरीकडे त्यांचा स्वत:शीच संवादही सुरू होतो. कोर्सचे मूलभूत स्वरूप जरी दरवर्षी तेच असले, तरी दरवर्षी थीम मात्र प्रासंगिक महत्त्वाच्या मुद्यानुसार वेगवेगळी असते.

सुनियोजित जीवनशैली ही नेहमीच सुखप्रद व सुविहित असल्याने, ह्या कोर्समध्ये इतर कौशल्यांबरोबरच, वेळेचा सदुपयोग (टाईम मॅनेजमेंट) करण्याची कला, ज्यामध्ये घर व ऑफिस हे दोन्ही सांभाळण्यात स्त्रीची जी तारेवरची कसरत होत असते, त्यामध्ये संतुलन कसे मिळवावे, एका वेळेला होऊ शकणारी अनेक कामे प्रभावीपणे कशी करावीत (मल्टीटास्किंग), ह्या बाबतीत विशेष मार्गदर्शन केले जाते.

सध्याच्या युगात सर्वत्र व्यावहारिक पातळीवर व वैयक्तिक पातळीवरही सर्वात जास्त प्रचलित असलेल्या इंग्रजी भाषेचे अनन्यसाधारण स्थान लक्षात घेता, इंग्रजीमध्ये संभाषण करता येणे ही केवळ गरजच नव्हे, तर तो एक आवश्यक गुण मानला जातो. अस्खलित इंग्रजीमध्ये संभाषण करता येण्याने जगात वावरताना आत्मविश्वास वाढतो. हे ध्यानात घेऊन ह्या कोर्समध्ये इंग्रजी संभाषणावर विशेष भर दिला जातो. ज्या स्त्रियांना इंग्रजीचा गंधही नाही त्यांच्यासाठी बाळबोध संभाषणांपासून सुरुवात केली जाते. तर ज्या स्त्रियांना इंग्रजी भाषेची ओळख आहे, पण सराव नसल्यामुळे बोलता येत नाही, त्यांना त्यानुसार आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाते.

कोर्स संपताना एका सायंकाळी संगीत व अन्य कार्यक्रमांच्या सादरीकरणाचे आयोजन केले जाते. ह्या कार्यक्रमात ह्या कोर्सच्या सर्व विद्यार्थिनी – वय, व्यवसाय आदिंविषयी कुठलाही अपवाद न करता – भाग घेतात. आपल्यात काहीतरी कमी आहे ह्या गैरसमजुतीपोटी ह्या स्त्रियांना आलेल्या न्यूनगंडावर व स्टेजफीअरवर त्यांना मात करता यावी हा ह्यामागील उद्देश असतो.

डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशी स्वत: जातीने हजर राहून प्रत्येक सत्राचे संचालन करतात व दर वर्षीचा कोर्स अभ्यासक्रम तयार करण्यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. इतकेच नव्हे, तर दर वर्षीच्या कोर्सच्या अखेरीस हा जो कार्यक्रम सादर होतो, त्यात प्रस्तुत होणाऱ्या नाटुकल्या व अन्य सादरीकरणांचे दिग्दर्शनही त्या करतात.

ह्या कोर्सची प्रवेशप्रक्रिया खूप सोपी आहे, केवळ एक फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक इच्छुक विद्यार्थिनीशी वैयक्तिकरित्या बोलल्यानंतरच त्या वर्षीची बॅच निवडली जाते.

’आत्मबल’ ही काही स्त्री-मुक्ती चळवळ नव्हे....नक्कीच नव्हे. तर स्त्रीला व तिच्या कुटुंबाला आणि आप्तांना आनंदाची प्राप्ती होण्यासाठी जो तिचा व्यक्तिमत्त्व विकास व प्रगती होणे आवश्यक आहे, त्याकरिताच ’आत्मबल’ आहे.

इथे स्त्रीच्या, ’स्व’चा शोध घेण्याच्या प्रवासाची सुरुवात होते व तो जन्मभर चालतो....आता ’आत्मबल’ तिच्या पाठीशी, तिच्या बरोबर व तिच्या अंतरंगातच असल्याने हा प्रवास प्रत्येक पावलाला अधिकाधिक सुंदर होत जातो.

....कारण ’आत्मबल’ म्हणजे जीवनाकडे, जगाकडे, इतकेच नव्हे तर स्वत:कडेदेखील बघण्याचा उचित दृष्टिकोन!

’आत्मबल’मध्ये सहभागी झालेल्या सर्व स्त्रियांमध्ये जिव्हाळ्याचे बंध निर्माण होतात – स्वत:बरोबर व त्यांच्याबरोबर सहभागी झालेल्या सह-विद्यार्थिनींबरोबरदेखील.  मात्र आपल्या हातात दुसरीचा हात पकडून कितीही मोठी साखळी तयार केली तरी साखळीतील शेवटचीचा एक हात नेहमीच मोकळा असतो – अजून एकीचा हात धरण्यासाठी!

चला तर मग, हातात हात गुंफूया....सद्गुरुंच्या व आपल्यासाठी शक्तिचा प्रमुख स्रोत असणाऱ्या मोठ्या आई (महिषासुरमर्दिनी) च्या आपल्यावरील प्रेमाची सतत जाणीव ठेवून त्याबद्दल प्रेमळ कृतज्ञता बाळगूया -  ’अंबज्ञ’ होऊया.


ll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll

0 टिप्पणियाँ:

एक टिप्पणी भेजें